जोपासा करिअर निवडण्याची "आजादी"

जोपासा करिअर निवडण्याची "आजादी"

श्री.गोकुळ विश्वनाथ महाजन

एम.टेक. (केमिकल इंजिनिअरींग)

सुवर्णपदक विजेता

       माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो, भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ३४% लोकसंख्या १५-२४ वर्ष  वयोगटात मोडते. एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे की, २०२२ मध्ये आपल्या देशातील जनतेचे सरासरी आयुमान २८ वर्षांपेक्षाही कमी असेल, त्यातुलनेत अमेरिका व चीनमधील जनतेचे सरासरी वय ३७, पश्चिम युरोपमध्ये ४५ व जपान मध्ये ४९ वर्ष असेल. म्हणजेच काय तर आपला देश हा "तरुणांचा देश" आहे. आपल्या देशाचे भवितव्य हे सर्वस्वी तरुणाईच्या हातात आहे, हे निश्चित.
"युनिसेफ"च्या २०१९ च्या अहवालानुसार, भारतातील तब्बल ४७% तरुणाई भरकटलेली दिसून येते, आयुष्यात काय करायचे याबद्दल त्यांच्या मनात साशंकता आहे, तसेच त्यांचाकडे रोजगारासाठी आवश्यक अश्या कौशल्यांचीही कमतरता दिसून येते. खरे तर, तरुणाई पिछाडीवर असण्यामागे खूप  सारी कारणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने करिअरबद्दल अयोग्य निर्णय, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव (विशेषतः खेडयांमध्ये), अवास्तव कौटुंबिक अपेक्षा, शिक्षणाचे बाजारीकरण, रोजगारनिर्मितीतील घट व अपेक्षित रोजगारासाठी प्रतिकूल औद्योगिक प्रणाली अश्या अनेक गोष्टी आजच्या तरुणाईच्या जडणघडणीत अडथळे बनत आहेत, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे एकदा का आपण आपल्या ध्येयाने झपाटून निघालो की हे करायचचं , तेव्हा ती उर्मी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे आगेकुच करायला प्रोत्साहित  करते. म्हणून करिअर निवड हा आयुष्यातील  अत्यंत महत्वाचा भाग आहे. उभ्या आयुष्याची ३०-४० वर्षे तुम्ही स्वतःला याच करिअरमध्ये  झोकून देणार आहात. मग तुम्हीच विचार करा आयुष्य किती सुंदर असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःला घडवणार. तुमचे एक वेगळे स्थान या क्षेत्रात असेल. म्हणजेच काय तर करिअर निवडताना स्वतःला स्वातंत्र्य द्या, तुमच्या आजच्या विचारांमागे पुढील अनेक वर्षाची यशस्वी वाटचाल ( संघर्षपूर्ण) तुम्हाला विचारात घ्यायची आहे.पैसा व प्रतिष्ठा ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या यशस्वी वाटचालीदरम्यान साध्य होतीलच.  

मग काय करायचं ? स्वतः  कसं निवडायचं दिशादर्शक करिअर ? चला तर खालील काही मुद्दे आपणास करिअरचे महत्व पटवून देतील.

* करिअर म्हणजे फक्त डॉक्टर, इंजिनिअर, वकील व शासकीय अधिकारी होणे नव्हे. तुमची अभिरुची ओळखून, तुमच्यात काय कौशल्य आहे ते बघून, आयुष्यभर मला कोणत्या क्षेत्रात चांगले काहीतरी करता येईल याची पडताळणी करून अचूक निर्णय घेणे व तशी वाटचाल करणे म्हणजेच करिअरची योग्य निवड.
* समाजात कोण काय करतेय? यापेक्षा मला माझ्यासाठी व माझ्या कुटुंबियांसाठी माझ्या क्षमतेनुसार काय करता येईल याचा ध्यास  निरंतर घेता आला पाहिजे. कुटुंबापासून देशहितापर्यंतचा प्रगल्भ विचार तुमच्या ध्येयामध्ये समाविष्ट असावा.
* आज विशेषकरून अनेकांचा स्पर्धापरीक्षेकडे कल दिसून येतो, ते योग्यही आहे पण गावातील अथवा परिचित एखादा व्यक्ती अधिकारी  झाला म्हणून मीही अधिकारी व्हावे, म्हणून स्पर्धापरीक्षांची निवड करणे व अनेक वर्ष अभ्यास करून काहीही हाती न लागणे, ही शोकांतिका आहे. स्पर्धापरीक्षेची निवड व भावी वाटचाल आखताना स्व-अध्ययन करणे फार गरजेचे आहे. स्पर्धापरीक्षेच्या अभ्यास करताना "प्लॅन बी"चा विचार करून ठेवा. अट्टहासापोटी उगीच आयुष्याची महत्वपूर्ण वर्ष वाया घालवू नका.

*  माझ्या नातेवाईकांमध्ये एखाद्याने ठराविक क्षेत्रात करिअर केले म्हणून मी सुद्धा तेच का करावे ?  आणि मी करणार असेल तर माझ्या स्वप्नांची धाव सुद्धा त्याच दिशेने हवी, हा विश्वास तुमच्यात रुजायला हवा. अत्यंत महत्वाचे असे की स्वप्न बघा पण ती स्वप्ने वास्तववादी व तुमच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत असायला हवी.  
* आपल्या कृषिप्रधान देशात शेतीनिगडीत अनेक संधी उपलब्ध आहेत व भविष्यात होतीलही. कृषीविषयक विविध क्षेत्राविषयी माहिती घेऊन आपल्याला कोणत्या संवर्गात भरारी घेता येईल याचा शोध घ्या.
*  नोकरीइतकेच किंवा त्यापेक्षाही जास्त स्वातंत्र्य तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात लाभेल. व्यवसायात जोखीम असली तरी त्यातून मिळणारा परतावा  नोकरीच्या कित्येक पटीने जास्त असतो. व्यवसायक्षेत्राविषयी स्वतःची अभिरुची व कौशल्य पडताळून घ्या आणि बघा तुम्ही त्या क्षेत्रात कुठवर मुसंडी मारू शकता.

* करिअरची निवड करतांना आपल्या माणसांकडून तसेच तज्ञ व्यक्तींकडून सल्ला जरूर घ्या मात्र शेवटी तुमच्या आवडीनिवडीला प्रथम प्राधान्य  द्या,  " येरे माझ्या मागल्या "  होऊ न देता "मी व माझं करिअर" याचा प्रवास आनंददायी होण्यासाठी स्वतःला करिअर निवडण्याची "आजादी" द्या. पालकांनीही याबाबत पाल्यास पाठिंबा द्या.