स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षासाठी माझे काही संकल्प!

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षासाठी माझे काही संकल्प!

 

दिलीप वैद्य, रावेर

९६५७७१३०५०

नमस्कार! १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा स्वातंत्र्यदिन! हा स्वातंत्र्य दिन नेहमीपेक्षा थोडा आगळा वेगळा आहे असं मला वाटतं कारण या दिवशी संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात होत आहे. 
*त्या निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!*

 १५ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात वर्षभर भारतात विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. केंद्र सरकार,राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, आपली शाळा, देशातील विविध क्षेत्रात कार्यरत संस्था या वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करतील.

 आपल्या देशाचा इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा हा अतिशय प्रेरक आणि प्रेरणादायी असा आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य इंग्रजांनी अगदी सहजासहजी दिले असे नाही. आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा लढा संघटीतरित्या १८५७ मध्ये सुरू झाला. असे असले तरीही इंग्रज आपल्या देशांत आल्यापासूनच त्यांना कमी अधिक प्रमाणात भारतवासियांनी विरोध केल्याच्या नोंदीही इतिहासात उपलब्ध आहेत. हा विरोध कधी व्यक्तिगत तर कधीच सामूहिक पातळीवर झाला, पण इंग्रजांनी तो शस्त्रास्त्रांच्या बळावर दडपून टाकला. मोठी हिंसा करून, 'फोडा आणि राज्य करा' ही नीती वापरून इंग्रजांनी सन १८१८ पर्यंत जवळपास सर्वच भारत आपल्या सत्तेखाली आणला.
 १८८५ मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सुसूत्रता आणि संघटितपणा आला. लोकमान्य टिळकांनंतर महात्मा गांधी यांच्याकडे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आले. एकीकडे गांधीजींच्या अहिंसक मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ सुरू असतानाच दुसरीकडे इंग्रजांना त्यांच्याच मार्गाने ठोशास ठोसा या नीतीने लढा दिला गेला. त्यात भगतसिंह, राजगुरु,सुखदेव, मदनलाल धिंग्रा, प्रीतीलता वड्डेदार, कल्पना दत्त,भगिनी निवेदिता आदि क्रांतिकारकांच्या प्राणार्पणाने आणि रक्तानेही स्वातंत्र्याचा हा लढा रक्तरंजित झाला.स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सोबत असंख्य स्वातंत्र्य वीरांनी हालअपेष्टा सहन केल्या. भारत मातेसाठी, तिच्या मुक्ततेसाठी अनेकांनी आपले रक्त सांडले, त्याग केला आपापल्या परीने जीवाचे रान केले. कोणी सत्याग्रह केला,कोणी रस्त्यावर उतरून हाती झेंडा घेऊन मिरवणुका काढल्या, कुणी इंग्रजांचा कायदा मोडत निषेध केला तर कुणी इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांच्याच पिस्तुल, बॉम्बने ठार मारले. याचा परिणाम म्हणून इंग्रजांनी अनेकांना तुरुंगात टाकले. काहींना फटक्यांची शिक्षा झाली तर काहींना सक्तमजुरीची! काहींना फासावर लटकावले तर काहींवर बंदुकीच्या गोळ्या चालविल्या. असे असले तरी भारतवासी डगमगले नाहीत. आपल्या प्राणांची बाजी लावून त्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. या सर्वांचा परिणाम म्हणून अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

 आपण दरवर्षी स्वातंत्र्यदिन साजरा करतोच पण आज ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करताना आपण काहीतरी संकल्प करावा असे मला वाटते.आपल्या पिढीला पारतंत्र्य माहिती नाही म्हणजेच आपल्याला हे स्वातंत्र्य विनासायास मिळालेले आहे. अर्थात पारतंत्र्याच्या काळात आपला जन्म झालेला नसल्याने आपण स्वातंत्र्य लढ्यात योगदान देऊ शकलो नाही असेही काही जण म्हणतील. हे खरे असले तरी आज भारताच्या उभारणीत आपण आपले सर्वोच्च योगदान देणे मात्र शक्य आहे आणि अपेक्षितही!  ते योगदान आपण सहजपणे देऊ शकतो. 
या वर्षभरात करण्यासाठी पुढील काही संकल्प माझ्या मनात आले आहेत.
  भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा सविस्तर इतिहास मी वाचीन.
 भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या कोणत्याही किमान पाच महापुरुषांचे चरित्र मी वाचीन.
 आपल्या जिल्ह्याचे,तालुक्याचे स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान आहे याची माहिती मी संकलित करीन.
 तालुक्यातील किमान पाच स्वातंत्र्यसैनिकांबद्दलची माहिती मी गोळा करून ती वाचीन.
 देशाचे राष्ट्रगीत (जन गण मन ) आणि राष्ट्रीय गीत ( वंदे मातरम ) हे शुद्ध स्वरूपात अर्थासह समजून घेऊन पाठ करण्याचा मी प्रयत्न करीन.

  मी आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाची परिपूर्ण माहिती मिळविन.
 देशभक्त आणि स्वातंत्र्य सैनिकांबद्दल, महापुरुषांबद्दल आदराची भावना ठेवीन.
  या महापुरुषांबद्दल त्यांची जात, धर्म, प्रांत असा भेद मनातही आणणार नाही.
**  देशाचा नागरिक म्हणून संविधानाचा आदर करीन आणि देशाच्या प्रगतीत अधिकाधिक हातभार लावण्याचा प्रयत्न करीन.
देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस होईल असे वर्तन मी कदापिही करणार नाही.
  या देशाने मला हवा,अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि विविध सुविधा अल्पदरात किंवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत म्हणून या देशाप्रती मी कृतज्ञतेची भावना ठेवीन.
  देशविघातक किंवा विध्वंसक कृत्य करणारे कोणी आढळल्यास निर्भयपणे मी पोलिसांना त्याची माहिती देईन.   या देशाचे रक्षण करणारे सैनिक, सेवा करणारे देशसेवक यांच्याबद्दल मी मनात आदराची भावना ठेवीन.  कुठल्याही प्रकारचा कर मला द्यावा लागणार असेल तर राष्ट्रहितासाठी तो मी आनंदाने देईन त्यात चोरी करणार नाही. खोटी माहिती देऊन विविध सवलती मिळविण्याची लाचारी करणार नाही. देश स्वच्छ, सुंदर, पर्यावरण पूरक ठेवण्यास सहाय्य करीन.

मी आपल्या भारतात तयार झालेल्या "स्वदेशी" वस्तूच वापरीन.  एकीकडे देशहितासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीनच पण दुसरीकडे देशातील अनुकरणीय संस्कृतीचेही जतन करण्यासाठी प्रयत्न करीन.  या देशाचा नागरिक म्हणून जसा येथील सोयी सुविधांवर माझा हक्क आहे असे मी समजतो तशी माझी कर्तव्येही आहेत हे मी समजून घेईन. मित्रांनो, मी केलेल्या या विविध संकल्पात आपणही आपल्या आपल्या कल्पनेनुसार आणखीही भर टाकू शकता आणि आपली इच्छा असल्यास आपणही यातील काही किंवा सर्वच संकल्प आपल्या मनाशी करून ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करू शकता.  हो..... पण असा संकल्प केलाच तर १५ ऑगस्ट २०२२ ला म्हणजेच एक वर्षाने आपणच आपले अंतर्मुख होऊन किती संकल्प पूर्ण केले याची खातरजमा आपण आपल्या पातळीवर करू या.
जय हिंद! वंदे मातरम!! भारत माता की जय!!!