धिंगरी अळिंबीची लागवड

सातपुडा विकास मंडळ, पाल संचलित, कृषी विज्ञान केंद्र,पाल तालुका. रावेर, जिल्हा. जळगाव( महाराष्ट्र)

धिंगरी अळिंबीची लागवड
धिंगरी अळिंबीची लागवड
धिंगरी अळिंबीची लागवड
धिंगरी अळिंबीची लागवड

अळींबी ही बुरशी वर्गातील विशिष्ट प्रकारच्या बुरशीचे फळ आहे. निसर्गात विशेषत: पावसाळ्यात ही अशी फळे पहावयास मिळतात. त्यास अळिंबी किंवा भुछत्र असे संबोधतात. इंग्रजीत ती मशरुम या नावाने ओळखतात. निसर्गात अळिंबीचे विषारी व बिनविषारी तसेच विविध आकार व रंगानुसार असंख्य प्रकार आहेत. निसर्गात वाढणा-या अळिंबीचा खाण्यासाठी वापर करण्यापूर्वी त्या खाण्यास योग्य आहेत किंवा नाहीत याची अनुभवी व्यक्तीकडून खात्री करुन घ्यावी.

जगभरात अळिंबीचे खाण्यास उपयुक्त असे 2000 प्रकार असून त्यापैकी भारतात 200 प्रकारांची नोंद केली आङे. वेगवेगळ्या देशात मिळून 10 - 12 प्रकारांच्या अळींबीची व्यावसायिक स्तरावर लागवड करण्यात येते. त्यापैकी भारतात बटण, धिंगरी व भाताच्या पेंढ्यावरील अळिंबीची लागवड प्रचलित आहे.

धिंगरी अळिंबी - या अळींबीस धिंगरी किंवा शिंपला व इंग्रजीत ऑइस्टर असे म्हणतात. जगामध्ये ही ळिंबी उत्पादनात दुस-या क्रमांकावर आङे. धिंगरी अळिंबीच्या लागवडीची पध्दत सोपी व कमी कालावधीची असल्याने सर्वसामान्य माणसांना थोड्याशा प्रशिक्षणानंतर कमी भांडवलामध्ये लागवड सुरु करता येते. महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अळिंबीस अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे.

अळिंबीचे आहारातील स्थान :-

आपल्या आहारात अनेक अन्नपदार्थ उपलब्ध असले तरीसुध्दा अळिंबीस आहारात वैशिष्टपुर्ण स्थान आहे. ताज्या धिंगरी आणि बटण अळिंबीमध्ये असणा-या अन्नघटकांच्या प्रमाणात लक्षणीय तफावत नाही. धिंगरी अळींबीतील प्रमुख अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. प्रथिने 22.78%  स्निग्ध पदार्थ  0.65 %, कर्बोदके5.2%, खनिजे 0.97%. तंतुमय पदार्थ 1.08%, पाणी 90%, खनिजापैंकी पालाश, स्फुरद, कॅल्शियम, लोह, सोडियम इत्यादी उत्तम प्रमाणात आहेत. जीवनसत्वापैकी ब-1, ब-2 आणि क यांचे प्रमाणही ब-याच भआजीपाल्यापेक्षा जास्त आहे. अळींबीतील प्रथिनांमध्ये शरीरवाढीसाठी आवश्यक त्या सर्व अमीनो आम्लांचा समावेश असून ती भाजीपाल्तील प्रथिनांपेक्षा उच्चप्रतीची व पचनास हलकी असतात. या बरोबर जीवाणू व विषाणू प्रतिकारक असलेली प्रथिने अळींबीमध्ये असतात. जीवनस्तव ब-2 मुळे शर्करायुक्त पदार्थांचे पचन, रक्तवाहिन्यांचे आंकुचन कमी होणे व लहान मुलांचा बेरीबेरा रोग निमावरण्यास मदत होते. क जीवनसत्वामुळे मुलांचा स्कर्व्ही रोग, नायसिन व पेंटॅथिनिक आम्लामुळे त्वचेचे रोग निवारण्यास तसेच हातापायांच्या तळव्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. लेह, तांबे या खनिजांचे दात व हाडे यांच्या वाढीसाठी व चांगल्या दृष्टीसाठी उपयोग होतो. फोलीक आम्लाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे येणारा अशक्तपणा कमी होतो. अळिंबीमध्ये पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प असल्याने मधुमेह असणा-यांना व स्निग्ध पदार्थ अत्यल्प असल्याने उच्च रक्तदाब असणा-यांना गुणकारी व आरोग्यवर्धक ठरते. अळिंबीमध्ये असलेल्या विविध औषधी गुणधर्मांमुळे प्रामुख्याने लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, ह्दयरोग, मधुमेह, कर्करोग, इन्फ्युएंझा, पोलिओ, एड्स, दमा, फुफुसांचे रोग, वंध्यत्व, विषाणूजन्य तसेच जिवाणऊजन्य रोग प्रतिबंधास अगर उफचारास विशेष उपयोग होतो म्हणून अळिंबीस हेल्थफुड असे संबोधले जाते.

धिंगरी अळिंबीचे प्रकार  :-

रंग, रुप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार धिंगरीचे विविध प्रकार आहेत. हे सर्व प्रकार प्ल्युरोटस् कुळातील आहेत. या कुळात प्ल्युरोटस साजर काजू ( करड्या रंगाची ) जात 20 ते 300 से. तापमान व 70 ते 90 टक्के आर्ध्रता असतांना चांगली वाढते. प्ल्युरोटस् प्लोरिडा ( मोठ्या आकाराची व शुभ्र वर्णाची) हीस 20 ते 300 से. तापमान व 80 ते 90 टक्के आर्द्रता अनुकूल असते. ही जात नाजूक असल्याने काळजीपूर्वक हाताळावी लागते. प्ल्युरोटस् एवोस ( गुलाबी रंगाची ) 21 ते 350 से. तापमान व 65 ते 90 टक्के आर्द्रता अशा विविध विषम हवामानात चांगली वाढते.

लागवडीसाठी आवश्यक बाबी :-  

जागेची निवड : -  धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण होईल अशा निवा-याची गरज असते. मातीच्या विटांची खोली, पक्के बांधकाम असलेली खोली, बांबूच्या तट्ट्यापासून तयार केलेली झोपडी किंवा पालापाचोळ्याची आच्छादन  असलेली झोपडी किंवा पोल्ट्रीचे शेड वापरता येते. जागा खेळती हवा व प्रकाश असणारी असावी.

अनुकूल वातावरण :-

याअळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 300 से. व हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते. यासाठी लागवडीच्या ठिकाणचे तापमान व आर्द्रता यांचे नियंत्रण ठेवणेसाठी जमिनीवर, हवेत तसेच चोहोबाजूने गोणपाटाचे आवरण लावनू त्यावर स्प्रेपंपाने पाणी फवारुन करावे. सर्वसाधारणपणे 250 से. या तापमानास या अळिंबींची उत्तम वाढ होते.

लागवडीसाठी माध्यम :-

धिंगरी अळिंबीची लागवड शेतातील पिकांचच्या मळणीनंतर निरुपयोगी अशा वाळलेल्या काडावर व पालापाचोळ्यावर करता येते. यासाठी मुख्यत: भात व गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका याची ताटे व पाने. कपाशी, सोयाबीन व तूर यांच्या काड्या, ऊसाचे पाचट, नारळ व केळी यांची पाने, मक्याची कणसे, भूईमूगाच्या शेंगाची टरफले इत्यादी वाळलेल्या काडांचा व पालापाचोळ्याचा वापर करावा.

लागवडीची पूर्व तयारी -

माध्यम - लागवडीसाठी लागणारे काड व पालापाचोळा हे माध्यम चालू हंगामातील व भिजलेले नसावे. माध्यम 1 ते 2 वर्षापूर्वीचे तसेच भिजलेले असल्यास त्यावर निसर्गातील सूक्ष्म जीवाणूंची वाढ झाल्याने अशा माध्यमांवर अळिंबीच्या बुरशीला अन्नासाठी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे उत्पादन कमी मिळते. काडाचे 2 -3 से.मी. लांबीचे तुकडे करुन ठेवावेत.

प्लस्टीक पिशव्या : -

धिंगरी अळिंबीची लागवड प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या वापरल्या जातात. परंतु लहान प्रमाणात लागवडीसाठी 100 गेज जाडीच्या 35 x  55 से.मी. आकाराच्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करावा.

मांडणी - अळींबीचे बेडस् ( ढेप ) ठेवण्यासाठी लेखंडी अथवा बांबूचे मांडणी ( रॅक्स ) किंवा बेडस् टांगूण ठेवण्यासाठी छताला समांतर तारा किंवा बांबू बांधून ठेवावेत.

बियाणे ( स्पॉन ) -  अळिंबीचे शुध्द बियाणे खात्रीशीर संस्थेकडून लागवडीपूर्वी 1 -2 दिवस आणून त्याचा वापर करावा.

याशिवाय फॉर्मेलिन ( जंतुनाश ) , बाविस्टीन ( बुरशीनाशक ) नुवान किंवा मॅलेथिऑन ( किटकनाशक ) पाणी व औषधे फवारण्यास स्प्रे पंप, काडाचे तुकजे करण्यास कोयता किंवा कडबा कुट्टी मशीन व काड निर्जतुकीकरण करण्याची सामुग्री आणून ठेवावी. पावसाळ्यात वाळवणी यंत्राचा वापर वापर आवश्यक आहे.

लागवडीची पध्दत :-

l काडाचे 2 -3 से.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरुन थंड पाण्यात 8 - 10 तास बुडवून भिजत घालावेत.

l काढाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा नियरा करावा.

l काडाचे निर्जंतुकीकरण करणे :-  

l भिजवलेल्या काडाचे पोते 800 से. तापमानाच्या गरम पाण्यात 1 तास बुडवावे. काडाचे पोते गरम पाण्यातून काढऊन त्यातील जादा पाणी निथळण्यासाठी व थंड होण्यासाठी तिवईवर ठेवावे किंवा काडाचे पोते 800 से. तापमानाच्या वाफेवर 1 तास ठेवून भिजविलेल्या काडेचे निर्जुंतुकीकरण करावे. काड थंड करण्यासाठी पोत्यासह सावलीत ठेवावे.

l अथवा निर्जंतुकीकरणासाठी 7.5 ग्रॅम बाविस्टीन ( बुरशीनाशक ) व 50 मि.ली. फॉर्मेलिन ( जंतुनाशक ) 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये वाळलेले काड पोत्यात भरुन 18 तास भिजत घालावे. द्रावणातील काड पोत्यासह बाहेर काढून जादा पाण्याचा निचरा करावा.

l काड 35 x 55 से.मी. आकाराच्या 5 टक्के फॉर्मेलीनमध्ये निर्जंतुक केलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये थर पध्दतीने भरावे. हे काम 5 टक्के फॉर्मेलीचे द्रावण फवारुन निर्जंतुक केलेल्या बंदिस्त जागेत करावे.

l काड भरतांना प्रथम 8 - 10 से.मी. जाडीचा काडाचा थर द्यावा व त्यावर अळिंबीचे बियाणे ( स्पॉन ) पसरावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या दोन टक्के असावे. काड व स्पॉन याचे 4 -5 थर भरावे. भरतांना तळहाताने काड थोडेसे दाबावे. पिशवी भरल्यानंतर दो-याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीने छिद्रे पाडावीत.

l भरलेल्या पिशव्या निवा-याच्या जागेत मांडणीवर आळिंबीच्या बुरशीच्या वाढीसाठी ठेवाव्या. त्यासाठी 25 - 280 से. तापमान अनुकूल असते. बुरशीची पांढरट वाढ सर्व पृष्ठभागावर दिसून आल्यावर प्लॅस्टीकची पिशवी काढून टाकावी. बुरशीची वाढ होण्यास 10 ते 15 दिवस लागतात. बुरशीच्या धाग्यानी काड घट्ट चिकटून त्यास ढेपेचा आकार प्राप्त होतो. यासच बेड असे म्हणतात.

पिकाची निगा :- धिंगरीचे प्लॅस्टीक पिशवी काढलेले बेड मांडणीवर योग्य अंतरावर ठेवावे. बेडवर दिवसातून दोन - तीन वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. जमिनीवर, भिंतीवर पाणी फवारुन पिकाच्या खोलीतील तापमान ( 25 - 300 से.) व हवेतील आर्द्रता ( 65 - 75 टक्के ) नियंत्रित करावी. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी खेळती हवा व प्रकाश यांची गरज आहे. 3 -4 दिवसांत बेडच्या सभोवताली अंकूर ( पीनहेड ) दिसू लागतात व पुढील 3 -4 दिवसांत त्याची झपाट्याने वाढ होऊन ती काढण्यासाठी तयार होते.

काढणी  :-

पहिली काढणी पिशवी भरल्यापासून 20 - 25 दिवसात मिळत. काढणीपूर्वी 1 दिवस अळिंबीवर पाणी फवारु नये. यामुळे अळिंबी कोरडी व तजेलदार रहाते. अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी काढणी करावी. लहानमोठी सर्व अळिंबी एकाच वेळी काढून घ्यावी. काढणी अळिंबीच्या देठाला धरुन पिरगळून करावी. दुसरे पीक घेण्यापुर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवून कुजलेल्या व मोकळ्या झालेल्या काडाचा पातळसा थर काढून टाकावा. 8 - 10 दिवसांनी दुसरे पीक मिळते व त्यानंतर 8 - 10 दिवसांनी तिसरे पीक मिळते. साधारणपणे 6 किलो ओळ्या काडाच्या एका बेडपासून 45 ते 50 दिवसांत 1 किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते.

किडीचा बंदोबस्त करण्यासाठी काढणीनंतर प्रत्येकवेळी मॅलेथिऑन किंवा नुवान 0.02 टक्के ( 10 ली. पाण्यात 2 मि.ली. ) या प्रमाणात फवारणी करावी. बेडवर फळे असतांना किटकनाशके फवारु नयेत.

अळिंबीची साठवणूक :-

ताजी अळिंबी पालेभआजीप्रमाणे अल्पकाळ टिकणारी व नाशवंत आहे. काढणीनंतर काडीकचरा बाजूला काढून स्वच्छ अळिंबी छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये एक दिवस राहू शकते. प्रीजमध्ये तीनचार दिवस टिकते. ताज्या अळिंबीस बाजारपेठ नसल्यास अळिंबी उन्हामध्ये वाळवावी. अळिंबी उन्हामध्ये दोन - तीन दिवसांत पूर्णपणे वाळते. वाळेलेली अळिंबी प्लॅस्टीक पिशवीत सील करुन ( हवाबंद ) टेवल्यास ती सहामहिन्यांपेक्षा अधिक कराळ चांगल्या स्थितीत राहते. वाळलेल्या अळिंबीचे वजन ओल्या अळिंबीच्या वजनाच्या 1/ 10 इतके कमी होते.

धिंगरी अळिंबीचे खाद्यपदार्थ :-  -  

अळिंबीचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करता येतात. उदा. भजी, समोसे, सॅलड, क्रीम अळींबी, सुंकी किंवा रस्साभाजी, अळींबी -टोमॅटो, अळिंबी भेंडी, भरलेली मिरची, ऑम्लेट, पुलाव, पिझा, सूप, लोणची इत्यादी . त्याचप्रमाणे इतर खाद्यपदार्थात मिसळून चवदार व पौष्टीक पदार्थ बनवता येतात. वाळवलेली धिंगरी कोमट पाण्यात 10 - 15 मिनिटे भिजविल्यानंतर खाण्यासाठी ताज्या धिंगरीसारखी वापरता येते. तसेच वाळविलेल्या धिंगरीची पावडर करुन ती स्वादिष्ट सूप करण्यासाठी वापरता येते.

पदार्थ-

१). अळिंबीचे सालड

 साहित्य-  १. अळिंबी- १५०ग्राम

२. हिरवे ताजे वाटणे- २००ग्राम

३. गाजर- २५० ग्राम

४. बटाटे – १५० ग्राम    

५. वनस्पती तूप\ तेल- १ टेबल स्पून          

६. मीठ व मिरी पावडर- चवी पुरते

कृती- गाजर, बटाटे , मशरूम यांचे लहान कप करावे. पातेल्यात जरुरू पुरते पाणी घेऊन त्यात वाटणे, गाजर, व बटाटेशिजवावेत. अळिंबीचे काप तुपात अथवा तेलात वाफ आणून शिजवावेत. शिवलेल्या अळिंबीत गाजर व बटाटे मिसळून चवी पुरते मीठ व मिरी पावडर घालून वाढावे

 

२. तुपात शिजवलेली अळिंबी-

साहित्य- १. अळिंबी- १५०ग्राम             

२. मध्यम आकाराचा कांदा- १    

३. तूप-  १ टेबल स्पून

४. मीठ व मिरी पावडर- चवी पुरते

कृती- पातेल्यात तूप गरम करावे व त्यात चिरलेला कांदा परतवावा कांदा अर्धा शिजल्यावर काप केलेली अळिंबी त्यात घालावी व मंदाग्नी वर शिजू द्यावी. गरज पडल्यास १ टेबल स्पून पाणी घालावे. शिजलेल्या अळिंबी वर जरुरी पुरते मीठ व मिरी पावडर टाकावे शिजलेली गरम अळिंबी ब्रेड अथवा चपाती सोबत खाल्यास चांगली लागतात

 

३. अळिंबी-टोमँटो

साहित्य- १. अळिंबी-  २०० ग्राम           

२.टोमँटो- २५० ग्राम      

३.मध्यम आकाराचा कांदा- १     

४.हिरव्या मिरच्या – २-३                      

५. तेल – १ टेबल स्पून                

६. मीठ – चवी पुरते

कृती-  अळिंबी, टोमँटो व कांदा यांचे काप करावेत. हिरव्या मिरच्या उभ्या चिराव्यात. गरम तेलात कांदा व मिरची तळावी. नंतर त्यात अळिंबी काप घालून झाकण ठेवावे व मंदाग्नी वर ५ मिनिट ठेऊन वाफ आणावी . टोमँटोचे काप अळिंबीत मिसळून मंदाग्नी वर अळिंबी  शिजेपर्यंत ठेवावे. चवीपुरते मीठ घालावे.

४. अळिंबी-भेंडी

साहित्य- १. अळिंबी- २५० ग्राम

२. भेंडी- २५० ग्राम       

३. कांदा- १      

४.तेल- १ टेबल स्पून      

५. कोथांबीर- १ जुडी     

६. मीठ व मिरी पावडर – चवी पुरते

कृती- मशरूम व भेंडीचे उभे काप करावेत प्रथम १/२ टेबल स्पून तेलात अळिंबी वाफ आणून शिजून घ्यावी.वेगळ्या पातेल्यात उरलेल्या तेलामध्ये भेंडी मंदाग्नी वर तळावी. तळात असताना भेंडी वर थोडे थोडे पाणी शिंपडावे. यामुळे मुळे भेंडीचा हिरवा रंग कायम राहतो. तळण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यामध्ये चिरलेली कोथांबीर, कांदा व मीठ घालावे. भेंडी शिजल्यावर त्यात अळिंबी मिसळून वाढावे

 

५. अळिंबीचे सूप

साहित्य- १. अळिंबी- १००ग्राम             

२. मोठा कांदा – १                    

३. लसूण पाकळ्या- ४-५

४. लिंबाचा रस- १ टेबल स्पून                 

५. चिकनस्टाक- १ काप              

६. मीठ व मिरपूड- चवी पुरते

७.लोणी मलई- जरुरी पुरते

कृती- फ्रायपँन मध्ये कापलेला कांदा व लसूण लालसर होईपर्यंत परतावा. मीठ पाण्यात घालून पातेल्यात अळिंबी शिजवावीत. कांद्यात शिजलेली अळिंबी, मीठ , मिरपूड, चिकनस्टाक घालावाव उकळी येउ द्यावी, नंतर पँन खाली उतरवून त्यात लिंबाचा रस व अर्धा कप मलई घालावी. नंतर मिक्सरमध्ये एकजीव करावे. थोडे गरम सूप वाढावे.

६. क्रीम-अळिंबी

साहित्य- १.  अळिंबी- २५०ग्राम

२.वनस्पती तूप- ३ टेबल  स्पून     

३.गव्हाचे पीठ- १ टेबल स्पून

४.क्रीम मिल्क- ४/५ कप              

५. मीठ व मिरपूड – चवी पुरते .

कृती- तुपात अळिंबीचे काप शिजवावेत. नंतर त्यात पीठ , मीरपूड व मीठ घालून मिसळावेत. त्याध्ये नंतर क्रीम मिल्क घालून मंदाग्नी वर ३-५ मिनिट वाफ आणावी. गरम लोणी लावलेल्या टोस्ट सोबत क्रीम- अळिंबी  चांगली लागतात.

७. अळिंबीचे सामोसे-

कृती- नेहमीच्या पद्धतीने समोश्यांची तयारी करावी. उभे काप केलेली अळिंबी तुपात किंवा तेलात तळून घ्यावी. तळलेली अळिंबी सामोशात भरून असे सामोसे मंदाग्नी वर तेलात अथवा तुपात तळावे.

८. अळिंबी पुलाव-  साहित्य- १. बासमती तांदूळ- ५०० ग्राम,    २. अळिंबी- १०० ग्राम

३. कांदा(कापलेला)- ५० ग्राम     

४.पाणी- १ लिटर          

५. मीठ- १२ ग्राम                      

६. तूप- १२ ग्राम

७. जिरे- २ ग्राम

कृती- तांदूळ धुऊन अर्धातास भिजत ठेवावेत, पातेल्यात तूप गरम करून त्यात कांदा, जिरे  व अळिंबीचे काप लालसर होईपर्यंत परतवावे. त्या नंतर पातेल्यात पाणी घालून ते उकळू द्यावे. पाणी उकलण्यास सुरवात झाल्यावर त्यात तांदूळ व मीठ घालून झाकून ठेवावे. पातेले मंदाग्नीवर त्यातील पाण्याची वाफ होईपर्यंत ठेवावे. अळिंबीच्या स्वादाचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी, पुलाव शक्यतो खाण्यास वापरण्यापूर्वी तयार करावा व गरम असताना खाण्यास द्यावा. वाढताना खिसलेले खोबरे व कोथांबीर घालून वाढावे. 

बाजारपेठ:- ताज्या व वाळलेल्या धिंगरी अळिंबीची नियमित खरेदी करणारे दलाल किंवा यंत्रणा नसल्याने वैयक्तिक पातळीवर संपर्क साधऊन विक्री व्यवस्था करावी लागते. त्यासाठी हॉटेल्स, बेकरी, डेअरी, डिपार्टमेंटल स्टोअर्स, पीझा सेंटर्स, केटरींग व्यवसायीक, अन्नप्रक्रिया करणारे उद्योग यांच्याशी संपर्क साधावा. सूपसाछी पावडर किंवा लोणच्याच्या स्वरुपात देखील विक्री करता येते. ताजी व वाळलेली धिंगरी अनुक्रमे 100 ते 150 व रु. 1000 ते 1200 प्रति किलो भावाने विकली जाते.