शिक्षकच सुसंस्कारित पिढी घडवू शकतात: ना. रंजना पाटील

शिक्षकच सुसंस्कारित पिढी घडवू शकतात: ना. रंजना पाटील

रावेर (प्रतिनिधी)-

तालुक्यातील विविध शाळांमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्यासाठी रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीच्या वतीने आज शनिवारी (ता.२१) रोजी तांदलवाडी येथील माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्काराच्या माध्यमातून तालुक्यातील पाच शिक्षक व एक आदर्श शाळा यात तांदलवाडी येथील माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय तांदलवाडी या शाळेला गौरविण्यात आले.

       शिक्षकांबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान कायम असते. विद्यार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षकच योग्य मार्गदर्शन करु शकतात असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी मांडले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील आदर्श शिक्षक रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कुल चे मुख्याध्यापक तुळशीदास महाजन, के-हाळे येथील दत्तू सोनजी पाटील विद्यालयातील शिक्षिका प्रेमलता चौधरी, विवरे येथील ग. गो. बेंडाळे विद्यालयातील शिक्षक अर्जुन सोळूंके, चिनावल येथील नुतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण ठाकूर व चिनावल येथील खिजर उर्दु हायस्कूलचे शिक्षक आजीमखान रशीदखान या आदर्श शिक्षकांना सपत्नीक वीस ग्रॅम चांदीचे पदक, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व झाडाचे रोपटे देऊन गौरविण्यात आले. तसेच तांदलवाडी येथील माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय तांदलवाडी या शाळेला सुद्धा तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ए. आर. चौधरी, माजी आमदार व चेअरमन राजाराम महाजन, मुकेश पाटील, एस. के. महाजन व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते शैलेश पाटील, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे. के. पाटील उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचलल दिलीप वैद्य यांनी केले, प्रस्ताविक विजय चौधरी तर आभार नितीन महाजन यांनी मानले. कार्यक्रमास रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष विजय चौधरी, उपाध्यक्ष नितीन महाजन, सचिव एस. टी. महाजन, एन. व्ही. पाटील, दिलीप वैद्य, टी. जी. बोरोले, ए. डी. चौधरी, शिरीष वाणी, वाय. एस. महाजन, एस. व्ही. येवले, ए. डी. पाटील, प्रमोद नरवाडे, नरेंद्र दोडके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.